Wednesday, November 14, 2018

विद्या अन विनय

विद्या विनयेन  शोभते 



शुभ्र  वस्र  धारण केलेल्या अन विद्येचं दैवत असलेल्या  ,गळ्यात मोती गुंफलेल्या सरस्वतीला वंदन करून

विद्या अन विनय यांचा सुरेख मिलाप म्हंजेच शिक्षण होय . ज्ञान या आणि  नम्रता यांचा सुरेख संगम म्हणजे शिक्षण होय .नम्रतेशिवाय ज्ञाना ला शोभा येत नाही ,म्हणून लहानपणापासून विद्या विनयेन शोभते हा सुविचार आपल्या कानावर घातला जातो व शाळेत त्याचे धडे गिरवले जातात .मित्रानो ,संस्कार नम्रता अन  ज्ञान यांची सुरवात शालेय जीवनापासून शिकविले जाते वयाचा सोळाव्या वर्षी तोरणा घेणारे शिवराय ,बिरबलाची चतुरकचातुर्य  यांचे बाळकडू पाजले जाते ते शाळेतच पण हे सगळे विचार इतिहास जमा का होतात ?शिक्षकांशी कसे बालबोलाववडीलधाऱ्यांच्या चार शब्द इकून घ्यावे ह्या गोष्टी का कुणाचाच लक्षात येत नाही ?

शिक्षणाच्या मुळाशी ‘विनय’ असायला हवा, नेमका तोच दिसेनासा होतोयं..विद्या विनयेन शोभते हा सुविचार अनेक जणांनी शाळेच्या भिंतीवर किंवा अनेक वक्त्यांच्या तोंडातून ऐकला असेल. तो महत्त्वाचा आहे म्हणून तर त्याचा उल्लेख केला जातो. सुविचार म्हणजे चांगला विचार. शिक्षण घेत असल्यापासून असे काही सुविचार विद्याथ्र्याच्या, माणसांच्या जीवनात निश्चितच बदल घडवून आणताना दिसतात. विद्या म्हणजे ज्ञान. विनय म्हणजे नम्रता. शोभणे म्हणजे चांगले दिसणे, योग्य असणे होय. म्हणजेच शिक्षण घेणारा, ज्ञान घेणारा हा नम्र असला पाहिजे तरच तो शिक्षणक्षेत्रात शोभून दिसायला लागतो. म्हणून हा संस्कार बालमनावर रुजला जावा, पिढय़ानपिढय़ा संस्कारशील व्हाव्यात, समृद्ध समाज निर्माण व्हावा, अन् देशाचा एक सच्चा नागरिक व्हावा म्हणून त्याची सुरुवात शाळेपासून केली असावी. 

आज शिक्षणात बरीच प्रगती झालेली दिसून येते.  शिक्षण ही आयुष्याची गुरुकिल्ली आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असेही म्हटले जातेय. अनेक समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे.    शिक्षणाने काय चांगले, काय वाईट कळायला लागले. त्यामुळे आज शिक्षणक्षेत्रात फार मोठी स्पर्धा लागलेली दिसून यायला लागते. हे सारे खरे असले तरी या शिक्षणाच्या मुळाशी ‘विनय’ हा गुण असायला हवा. नेमका तोच दिसेनासा झाला आहे. विनय म्हणजे नम्रता. नम्रता या गुणात अनेक गुणांचा सद्गुणांना समुच्चय दडलेला आहे. नेमके तेच आम्ही हरवत चाललो आहोत. नम्रता यामध्ये माया, ममता, कनवाळूपणा, सहकार्य, मदत, शिस्त अशा अनेक गुणांचा समावेश असतो. पण या गुणाकडे आज विद्यार्थीदशेपासून दुर्लक्ष होताना दिसते. त्याचबरोबर शिकलेल्यांमध्ये व अनेक नोकरांमध्ये किंवा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यामध्ये हा गुण लुप्त झालेला दिसून येतो आहे. विद्येचा म्हणजे शिक्षणाचा जो मुळ अर्थ आहे त्यापासून आम्ही दूर जात आहोत असे दिसून यायला लागले आहे.
आज शिकलेल्यांमध्ये किती विनयशीलता आहे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. आज वेगवेगळ्या कार्यालयात शैक्षणिक संस्थांमध्ये, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्याथ्र्यामध्ये आपणाला फारच कमी प्रमाणात विनयशिलता दिसून यायला लागली आहे. त्याचा वाईट परिणाम समाजमनावर पर्यायाने देशावर होताना दिसून येतो आहे. शिकलेला सवरलेला उच्च विद्याविभुषितही आज स्वार्थासाठी, फायद्यासाठी, पद मिळविण्यासाठी आपल्यातील चांगल्या सद्गुणांना, विचाराला सोडून वाईट मार्गाने मार्गक्रमण करताना दिसतो आहे. चांगल्याला चांगले म्हणण्याची हिंमत आज तरी बोटावर मोजण्याइतके सोडले तर कुणामध्ये दिसून येत नाही. हे वास्तव भयानक आहे. यालाच म्हणायचे का नम्रता. अहो, नम्रता म्हणजे केवळ नतमस्तक, लवून, वाकून नम्र होणे नाही तर त्यामध्ये संस्कार, निती, आचार, विचार, कृती, मुल्ये अशा अनेक गोष्टींचाही समावेश असतो.
आज आम्ही शिकलो आहोत पण लाचार झालो आहोत. अनितीने म्हणजे लबाडीने वागत चाललो आहोत. त्यामुळे शिकलेल्यांमध्ये विनयशीलता दिसून येईनाशी झाली आहे. कार्यालय, शाळा, महाविद्यालय, शिकलेली माणसं किती वाईट पद्धतीने वागतात. विनयशीलता म्हणजे नम्र. अहंकार नसणे. आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देणे. जसे झाडांना फळे आल्यानंतर झाडांच्या फांद्या वाकतात म्हणजेच नम्र होतात, तेच झाड आपल्या फळांचा उपयोग इतरांच्या शरीरात सत्व भरण्यासाठी करते. इतरांना आनंद देण्यासाठी करते. अगदी तसेच विद्या घेणा:यांमध्ये नम्रता असली की , नम्रतेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी, सुविचारांसाठी मानवतेसाठी करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. म्हणूनच खेदाने म्हणावेसे वाटते की, आजच्या काळात शिकलेले लोकच (सर्व क्षेत्रातले) अराजकता माजवताना दिसत आहेत. हे वाईट आहे. त्यासाठी प्रत्येक सुशिक्षितांनी आपल्या विद्येचा म्हणजे शिक्षणाचा (ज्ञानाचा) उपयोग समाजहीत, देशहीत व मानवहीत यासाठीच करायला हवा. एवढेच या सुविचाराच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.